
बानूर
अमरावती जिल्ह्यातील चिखलदारा तालुक्यात बानूर या ठिकाणी श्री
गुणवंत महाराजांचे मंदिर आहे. बानूर हे एक लहानसे ग्राम आहे.
हे ठिकाण अगदी जंगलभागात आहे. तेथे जाण्यासाठी पक्की सडक
नाही. या ठिकाणा संबंधी एक समजूत अशी आहे की, याच ठिकाणी श्री गुणवंत महाराजांना सिद्धि प्राप्त झाली होती. महाराजांनी आराधना, प्रार्थना आणि उग्र तपश्चर्या करुन सिद्धि प्राप्ती केली. यामुळेच या क्षेत्राला विशेष महत्त्व आले आहे. या क्षेत्रा संबधी एक समजूत अशी आहे की, एक दिवस मोठा चमत्कार घडून आला. एका टेकडीवर श्री गुणवंत महाराज प्रगट झालेले गावातली गुराख्यांना दिसून आले. हे पाहून गुराख्यांना फार आनंद झाला. ते गुराखी नित्यनेमाने बरोबर आनलेल्या शिदोरीचा त्या देवाला नैवेद्य दाखवू लागले. नैवेद्य दाखवल्यानंतर मगच ते आपली कांदाभाकर खाऊ लागले. असा हा क्रम बरेच दिवस चालू होता. याच टेकडीवर नंतर देवालय उभारण्यात आले आणि तेथे श्री गुणवंत महाराजांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. सहा फूट उंचीची व तीन फूट रुंदीची मांडी घातलेल्या आसनाची मूर्ती हत्तीवर विराजमान झालेली आहे, मूर्ती अगदी रेखीव आहे, मूर्तीचे तोंड पूर्व दिशेला आहे. ह्या मंदिराचे तोंड सुद्धा पूर्वाभिमूख आहे. देवाच्या गाभाऱ्यापुढे आठ फूट रुंद असा ऐसपैस चौरस सभामंडप आहे. हे महाराजांचे अत्यंत जागृत असे हे स्थान आहे.मंदिर उंचवट्यावर असल्यामुळे मंदिरात शिरण्यापूर्वी टेकडीवर चढावे लागते. लांबून ते एखाद्या कौलारू घराप्रमाणे दिसते. देवालयासमोर एक सरोवर आहे. या परिसरात वनवासी समाजाची वस्ती आहे. डोंगरावरील हे ठिकाण फारच सुंदर आहे. पावसाळ्यात या डोंगराचे सौंदर्य काही औरच असते.
वनौषधि व पारंपारिक औषधी
या परिसरात व जवळच्या जंगलात औषधी वनस्पती व इतरही पारंपारिक औषधी, वनौषधि आहेत. निरगुडी, गवती चहा व इतर पारंपारिक वनौषधि येथे आढळतात.